मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे ही महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी ऍटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांचा फौजफाटा आपली बाजू मांडणार आहे.

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका संजीव शुक्‍ला आणि ऍड. जयश्री पाटील यांनी सादर केल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाचे समर्थक विनोद पाटील यांनी कॅव्हिएट दाखल केले आहे. ऍड. पाटील यांच्यातर्फे ऍड. गुणरत्न सदावर्ते तर विनोद पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील रणजित कुमार बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रोहतगी यांच्याबरोबरच ज्येष्ठ वकील तुषार मेहता व पलविंदरसिंग पटवालिया बाजू मांडतील. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे अन्य प्रकरणांमध्ये व्यस्त असल्याने सुरुवातीच्या सुनावण्यांमध्ये ते उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. ओबीसी व कुणबी समाजातर्फे कपिल सिब्बल व अन्य ज्येष्ठ वकील बाजू मांडतील.

Leave A Reply

Your email address will not be published.