मुंबई / औरंगाबाद : राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात महापुराने थैमान घातले आहे. पुराचा कहर झाल्याने संपूर्ण शेतीसह घरही पाण्याखाली गेली आहे. येथे ओला दुष्काळ दिसून येत आहे. तर शेजारच्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. या कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्यात येणार आहेत.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद विमानतळावरून आज विशेष विमान उडणार आहे. हे विमान ढगांना हेरार आहे. त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु होईल. मागील वर्षी २५० कोटी खर्चून सोलापूर येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. सोलापूर, सांगली जिल्ह्यातील माणदेश हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर आणि शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा त्या वेळी केला गेला होता.