मन व शरीराच्या मजबुतीसाठी योगा आवश्यक – नाना पाटील

0

भुसावळ | प्रतिनिधी
शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय असल्याचे भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील जेष्ठ शिक्षक तथा योगशिक्षक नाना पाटील सर यांनी येथे सांगितले.
थोरगव्हाण, ता. रावेर येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित प्रात्यक्षिक वर्गात ते बोलत होते. यावेळी संस्था संचालक प्रमोद पाटील, प्रविण पाटील, मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. योगशिक्षक नाना पाटील सर यांचा सत्कार संस्थाचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर योगशिक्षक नाना पाटील सर यांनी कपालभाती, ब्रामारी  अनुलोम, विलोम प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, हस्तपादासन, त्रिकोनासन, बटरफ्लाय, वज्रासन आदी योगांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. श्री. पाटील म्हणाले की, योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपुरती मर्यादित आहे, असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो. कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात, असेही त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी योग करताना आनंद व्यक्त केला. तसेच आयुष्यभर योगासने करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाय. जे. कुरकुरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.