जळगाव (प्रतिनिधी): मनपा आयुक्तपदी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सोमवारी दि.16 रोजी रुजू होणार आहेत.
मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान, दि.12 फेब्रुवारीला नागपूर येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालिका आयएएस अधिकारी माधवी खोडे-चवरे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्या रुजू झाल्या नाहीत. मनपात आयुक्तां अभावी अनेक प्रश्न प्रलंबित राहत असल्याने तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत केली होती. त्यामुळे दि.13 मार्च रोजी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती करुन आयुक्तपदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे. त्यानुसार नवे आयुक्त सतीश कुलकर्णी सोमवारी रुजू होणार आहेत.