मुंबई: मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही अशी परिस्थिती निर्माण होईल का? अशी राजकीय चर्चा सुरू आहे. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असतांना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सक्षम आहेत. त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. मात्र, मध्यप्रदेश सरकारबाबत साशंकता आहे. कमलनाथ काही करतील का? हे पाहावं लागेल, असं सांगतानाच काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच काँग्रेसमध्ये नेतृत्व, कर्तृत्व आणि भविष्यही असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
तसंच, ‘महाविकास आघाडीला 100 दिवस पूर्ण झाले आहे. 100 दिवसांमध्ये जे काम झालं ते चांगल्या प्रकारे झालं आहे. असं सांगत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसाच्या कारभाराला 100 टक्के मार्क्स दिले आहे. यावेळी त्यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवरही प्रतिक्रिया दिली. सरकारव लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केली असेल तर त्याचं स्वागतच आहे. त्यांनी चांगलं काही तरी केलं पाहिजे. लोकांसमोर चांगलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले. आयपीएलसाठी होणारी गर्दी टाळली पाहिजे, असं सांगतानाच शक्यतो सभा, मेळावे टाळा, असं आवाहनही त्यांनी केलं.

