चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन असताना चाळीसगाव शहरातील क्रिश वाईन्स या देशी-विदेशी दारू दुकानात टाळेबंदीच्या काळात मद्यसाठ्यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. विक्की नोतवानी व दिनेश नोतवानी यांच्या नावे हे दुकान होते.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च पासून जळगाव शहरातील व जिल्ह्यातील देशी व विदेशी दारूची सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी काढले होते. लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ झाल्यावर १७ मे अखेरपर्यंत दारू दुकाने बंद ठेवावीत असे सुधारित आदेशही देण्यात आले होते. मात्र जळगाव शहर व जिल्ह्यात चोरट्या व छुप्या मार्गाने दारूचा काळाबाजार जोरात सुरू होता. यापूर्वी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजू भोळे यांच्या पत्नी व माजी महापौर सीमा सुरेश भोळे यांची मालकी असलेल्या मे. नीलम वाईन्स या देशी-विदेशी दारू दुकानात टाळेबंदीच्या काळात मद्यसाठ्यामध्ये तफावत आढळून आल्याने या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.