लोकशाही न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड
पिंपरी : दारूच्या नशेत असलेल्या चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहनाने रस्त्याकडेच्या हातागाड्यांना धडक दिली. यामध्ये हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले. तर काही जण किरकोळ जखमी झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असल्याने . वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचा थरकाप उडाला होता.
चालक सुभाष दादासाहेब वाघमारे (वय ३०, रा. म्हातोबानगर, वाकड) याच्या विरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शुभम मनोज भंडारी (वय २५, रा. चापेकर चौक, चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली. आरोपी ८ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यपान करून चारचाकी वाहन चालवत होता.
वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकीने रस्त्यावरील हातगाड्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि अन्य व्यवसायिकांच्या हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच, हातगाडी जवळ उभे असलेले काहीजण किरकोळ जखमी झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.