मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पाळणाघर ते दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची सुविधा

0

जळगाव,-लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी पाळणाघरापासून ते दिव्यांगांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व इतर सोय करण्यात आली आहे. उन्हाळा लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल. मतदानावर करडी नजर ठेवण्यासाठी 10 ठिकाणी वेब कास्टींगची सोय करण्यात येईल.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी लोकलाईव्हशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वत्र लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे. मतदान प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सर्व मतदारांना मतदार पत्रिका वाटप करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित मतदान करता यावे, म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग राहील. तर महिलांसाठी सखी मतदार केंद्राचीही सुविधा राहील,असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.मतदानापासून नागरिकांना कोणी वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फ्लाइंगस्कॉड, व्हिडीओ चित्रिकरण, अ‍ॅडिशनल फोर्स लावण्यात येईल. मतदान यंत्रांची ने-आण करणार्‍या वाहनांवर जीपीएस यंत्रणा राहील. सुरू आहे. आदर्श आचारसंहिता सर्वांना पाळणे बंधनकारक आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास कुणीही सी वोटर या अ‍ॅपवर तक्रार करू शकतात. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई होईल. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास यंत्रणा कार्यरत आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात 42 तक्रारी आल्या आहेत. या अगोदर 48 तक्रारी निकाली काढण्यात आल्या,असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. प्रचार सभांवरही प्रशासनाची नजर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इतर कामांवर परिणाम नाही– निवडणुक कालावधीत निवडणुकींच्या कामांमुळे इतर कामांवर परिणाम होणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.सुमारे 17 हजार कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत राहतील. तर मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी 600 बसेस व इतर वाहनांची सुविधा केली आहे. मतदानाचे कामकाज पारदर्शी होण्यासाठी व्हिव्हिपॅड यंत्रणा कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले.
मतदानाचा अधिकार वापरा= मतदान करणे हे राष्ट्रीय कार्य आहे. या कार्यात सर्वांनी सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 23 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.