मंत्री सामंताची गाडी अडवून एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांची घोषणाबाजी

0

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत परिक्षांची सुरू असलेल्‍या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. बैठक घेवून परतत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला रोखून जोरदार घोषणबाजी दिल्या.

धुळे येथे एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांना पोलिसांकडून मारहाण झाली होती. यावेळी या घटनेचा सामंत यांच्या गाडीपुढे उभे राहून निषेध करत प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी येथे उपस्‍थित असलेल्‍या पोलिसांनी काही कार्यकर्‍त्‍यांना अटक केली. यामुळे विद्यापीठ परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

उदय सामंत राजीनामा द्या अश्याही घोषणा या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या. बैठकीसाठी उदय सामंत आले असल्‍याने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्‍त लावण्यात आलेला होता. कोणत्‍याही प्रकारचा गोंधळ निर्माण होवू नये याची दक्षता घेण्यात आली होती. तरी देखील एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांनी गाडी अडविली. विशेष म्‍हणजे बैठक आटोपून उदय सामंत निघण्याच्या तयारीत असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरवात झाली. अशा पावसात देखील कार्यकर्ते मागे न हटता सामंतांच्या गाडीपुढे उभे राहिले होते.

तसेच नंतर कुलगुरूंचीही गाडी अडविण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विराज भामरे, सोहम पाटील, आदेश पाटील, आदित्य नायर, पवन भोई, रितेश चौधरी, सिद्धेश्वर लटपटे,रिद्धी वाडेकर आंदोलनात सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.