मंगळग्रह मंदिरात अप्पर पोलीस महासंचालकांनी केले पर्यावरणपूरक उपक्रमांचे उद्घाटन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे (आय.पी.एस) यांनी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे उद्घाटन केले. संस्थेचे पर्यावरण विषयक काम पाहून त्यांनी सर्वांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.

संस्थेच्या रोपवाटिकेला संत श्री सद्गुरु सखाराम महाराज यांच्या नामकरणाचा फलकाचे त्यांनी अनावरण केले. तसेच श्री मंगळग्रह मंदिरात वाहिलेली फुले, फुल माळा आदींचे निर्माल्य, परिसरात जमा होणारा कचरा, पालापाचोळा आणि मंदिराने पाळलेल्या गायी यांचे शेण व मूत्र एकत्र करून त्यातून सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रमातून निर्माण होणारे शुद्ध व निर्भेळ सेंद्रिय खताचे त्यांनी लोकार्पण केले.

त्याप्रमाणे श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील सर्व झाडांना नामफलक व गणना प्रक्रियेचाही त्यांनी शुभारंभ केला. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी.ए. सोनवणे, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, सेवेकरी राहूल पाटील, उमाकांत हिरे, आर.जे पाटील, रविंद्र बोरसे, शरद कुलकर्णी, खिलू ढाके आदी उपस्थित होते.

मंदिराचे मुख्य पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. पुजारी तुषार दीक्षित यांनी सहकार्य केले. श्री साळुंके यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी श्री. साळुंके म्हणाले की, देवस्थानाच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी केला जात असलेला जनजागर अतिशय स्तुत्य व अनुकरणीय आहे. सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पही अत्यंत कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. संस्थेच्या एकूणच कार्याची वेगवान घोडदौड अचंबित करणारी आहे. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here