पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा सुरू असलेल्या चौकशी विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश आज ईडीला दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे यांना यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिलेला आहे.
भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणाची चौकशी ईडीने मागितली होती. अखेर न्यायालयाने मत स्पष्ट केले आहे की, ईडीला चौकशी करायची असल्यास 24 तासांपूर्वी कल्पना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आज झालेल्या सुनावणीत ईडीने याप्रकरणी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे जमीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी घेतलीआहे. दरम्यान ही जमीन मूळ जमीन मालकाकडून म्हणजेच अब्बास रसुलभाई उकानी यांच्याकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली.
पुढे नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. दरम्यान या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.