जळगाव विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे दाखल
भुसावळ :- येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्री साखर झोपेत असताना काही कारण नसतानाही शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज दुरुस्तीचे काम नियोजन न करता वेळी अवेळी दुरुस्तीचे कामे करुन वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कुणीच फोन उचलत नाही. बील भरले नाही तर तत्काळ वीज तोडली जाते मग पुरवठा खंडित झाला तर काय? शहर आणि परिसरात गेले काही दिवस वीजेचा लपंडाव सुरू आहे. अचानक वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
वाढत्या उष्मामुळे अंगाची लाही लाही होत असताना दुसरीकडे दुरुस्तीच्या नावाखाली सतत वीज गायब होऊ लागल्याने नागरिकांसाठी हा कालावधी ‘ताप’दायक ठरत आहेत वारंवार तक्रार नोंदवली तरी ठोस उपाय न घेतल्याने आज दिनांक ०९ मे रोजी जळगाव रोड विभागातील रहिवासी प्रा.धिरज पाटील यांनी जळगाव विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात भुसावळातील तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहचला. उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त बनत आहेत. उन्हाच्या झळा आणि चटक्यापासून शरीराला गारवा मिळावा म्हणून वातानुकुलित यंत्रणा, पंख्यांचा वापर वाढला आहे. सध्या भारनियमनाचा कालावधी नाही, तरीही पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नाही.
कोणाचाच वचक राहिला नाही
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जे कॉल सेंटर आहेत, तेथील दूरध्वनी हे बाजूला काढून ठेवण्याचे अनेक प्रकार सर्रासपणे घडतात. वीजपुरवठा खंडित होऊन तो पुन्हा कधी पूर्ववत होईल, याची माहिती विचारण्यासाठी वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याने देखील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी ज्या प्रमाणे लक्ष दिले जाते, त्या धर्तीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकडेही तेवढेच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे असे तक्रारीत नमूद केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियेतचा ग्राहकांना फटका:
बुधवारी रात्री १० वाजतानंतर मेन सर्व्हिस लाईनची तार अचानक तुटली. यामुळे शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अशी महावितरणच्या अभियंत्याने माहिती दिली. मात्र नंतर त्या अभियंत्याला मोबाईल उचलण्यास सवड नव्हती. रात्री अनेक वेळा नागरिकांनी फोन केले पण सुविधा केंद्र व अधिकारी यांनी फोन उचलला नाही. वीज वितरणचे बहुतांश महत्वाचे अधिकारी बाहेर गावी राहातात. वीज केंद्रातील रात्रपाळीचे कर्मचारी जाणीवपूर्वक मोबाईल स्विच आॅफ करून ठेवतात. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आता ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
दिवसा उकाड्यात, तर रात्री अंधारात राहावे लागत आहे. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय ठेवून ग्राहकांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्राहकांच्या वतीने देण्यात आला आहे.