भुसावळ वीज केंद्राने स्थापित केला नवा किर्तीमान

0

अविरत १ हजार कोळश्याचे रॅक विनाविलंब शुल्क रिकामे

भुसावळ –महानिर्मितीच्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने १० जून २०१९ रोजी अविरत १ हजारावा कोळशाचा रॅक रेल्वे प्रशासनाला ‘विना विलंब शुल्क  ठरलेल्या वेळेत रिकामा करून महानिर्मितीच्या इतिहासात नविन विक्रमाची सोनेरी अक्षरात नोंद केली. सप्टेंबर २०१८ पासून अविरत परिश्रम घेत मागील नऊ महिन्यांपासून “आम्ही करू शकतो” हे ब्रीद वाक्य समोर ठेवत व शुन्य विलंब शुल्काची संकल्पना राबवित हा विक्रम संपादित केला आहे.

सदल विक्रम करताना माहे सप्टेंबर २०१८ पासून ५६ हजार ९६७ कोल वॅगन आणि ३८२३५९५  मेट्रिक टन इतका कोळसा रिकामा करीत नवा किर्तीमान स्थापित केला. अविरत १ हजारावा रॅक विना विलंब शुल्क रिकामे करण्याचा हा विक्रम आजपर्यंत महानिर्मितीमध्येच नव्हे तर देशातील कोणत्याही औष्णिक विद्युत केंद्राला साध्य करता आलेला नाही हे विशेष.

राज्यात सर्वत्र कडक उन्हाळा असून विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असतांना पुर्ण क्षमतेने वीज उत्पादन होणे अपेक्षित आहे व त्यासाठी सातत्याने कोळसा पुरवठा होणे तितकेच महत्त्वाचे आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये दररोज १६ हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. रेल्वे प्रशासन कोळश्याने भरलेले रॅक रिकामे करण्यासाठी ठराविक वेळ वीज केंद्राला देते व त्यावेळेत जर रॅक रिकामे करून रेल्वेला परत केले नाही तर रेल्वे प्रशासन दंड म्हणून त्यावर विलंब शुल्क आकारते.तसेच रिकाम्या रॅकच्या उपलब्धते अभावी वीज केंद्राना कमी कोळसा पुरवठा होतो व याचा परिणाम वीज उत्पादनावर होतो.

वर्ष २०१७-१८ मध्ये १३१.५०  लक्ष रूपये, वर्ष २०१८-१९ मध्ये २१.४०  लक्ष रूपये इतके विलंब शुल्क रेल्वे प्रशासनाला दंड म्हणून देण्यात आलेले आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने हा दंड वाचवून कोटयावधी रूपयाची बचत केलेली आहे व वीज निर्मितीचा खर्च कमी करण्यात यश संपादित केले आहे. याचा मेरीट ऑर्डर डिस्पॅचसाठी पण फायदा झालेला आहे. २x५०० मेगावाटचे दोन्ही संच पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत तसेच रेल्वेकडून मुबलक कोळसा पुरवठा वीज केंद्राला होत आहे.

संचालक (संचलन) यांच्या पाच कलमी कार्यक्रमाचा अवलंब करून संयंत्राची उपलब्धता वाढविण्यात आली. रेल्वे प्रशासनासोबत कोळशाच्या रॅकच्या स्थिती समजून घेण्याबाबत ताळमेळ वाढविण्यात आला. शुन्य विलंब शुल्काचे महत्त्व वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आले. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे आणि वरिष्ठ व्यवस्थापनाचे वेळोवेळी मार्गदर्शन प्रोत्साहन, प्रेरणा व विश्वासाच्या पाठबळावर हे लक्ष्य साध्य करता आल्याचे मत मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी व्यक्त केले.

मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे प्रभारी उप मुख्य अभियंता मधुकर पेटकर, कार्यकारी अभियंता हेमंत लहाने, सर्व विभाग प्र मुख,अधिकारी, अभियंता, तंत्रज्ञ, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांचे अभिनंदन केले व अशीच यशस्वी घोडदौड चालू ठेवावी असे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.