सीसीटीव्ही कॅमे-यांची करडी नजर
भुसावळ :– मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वे स्थानक हे गुन्हेगारी मुक्त, भिकारी मुक्त, तसेच अवैध विक्रेत्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प भुसावळ मंडळाने केला असून दिनांक २५ एप्रिल पासून याकामाकरिता विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याकामी सीसीटीव्ही कॅमे-यांचा उपयोग करून २४ तास भुसावळ स्थानकावरील अवैध विक्रेते भिकारी व गुन्हेगार यांच्या फिरकावावर करडी नजर राहील. तसेच तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा बलाचे संयुक्त विद्यमाने दक्षिण आणि उत्तर प्रवेशद्वारावर तिकीटा शिवाय तसेच फलाट तिकीट (प्लँटफॉर्म तिकीट) शिवाय कोणासही प्रवेश मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
सर्व वैध विक्रेत्यांना विशेष ओळख पत्र देण्यात येणार असून ओळखपत्राशिवाय विक्रेत्यांनाही स्थानकावर मज्जाव करण्यात आला आहे . स्थानक परिसराला लागून असलेले अवैध रस्ते कुंपण बांधून बंद करण्यात आले आहे . रेल्वे फलाटाच्या दोन्ही बाजूंचे यार्डा वर सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. “नो क्राईम नो बेगिंग नो हॉकिंग “या जरी केलेल्या उपक्रमाचा फायदा प्रवास्यांसह शहरवासीयांना देखील नक्कीच होईल अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. तरी या उपक्रमास प्रवासी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.