भुसावळ :- भुसावळात ब्रिटीशकाळात रेल्वे परीसराला देण्यात आलेली नावे लवकरच बदलण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शहरातील आठ बंगला, दहा बंगला, चाळीस बंगला या नावाने परीचित असलेल्या भागांच्या नावांना आता देशातील विविध नद्यांची नावे तसेच जगप्रसिद्ध लेण्यांची नावे देण्यात येणार असल्याचा ऐतिहासीक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान डीआरएम आर.के.यादव यांनी या कॉलनी भागातील नामकरणाबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यास वरीष्ठ स्तरावरून मंजूरीदेखील मिळाली आहे. रेल्वे परीसरातील बदललेल्या भागांची आता नद्या तसेच लेण्यांच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण होणार असून बदललेल्या नावांबाबत नामफलक लावण्याच्या कामास रेल्वे प्रशासनाने वेग दिला आहे.
या नावाने ओळखल्या जाणार
रेल्वेच्या पंधरा बंगला भागातील अकाऊंट कॉलनी, हनुमान मंदिर, पीओएच कॉलनी, नर्सरी लाईन भागाची आता अजंनी कॉलनी म्हणून ओळख होणार आहे तर इन्स्टिट्यूट एरीया ते सीवायएम कार्यालय एरीया या भागाला एलोरा कॉलनी, गार्ड लाईन, फिल्म गोडावून, इंजि.ट्रेनिंग सेंटरला सातपुडा कॉलनी, 40 बंगला, आरपीएफ बॅरेक बाजूच्या परीसराला गंगोत्री कॉलनी, लिंम्पस क्लब ते एमओएचपर्यंतच्या परीसराला यमुनोत्री कॉलनी, रेल्वे नॉर्थ कॉलनी गोदावरी कॉलनी, सी रोड ते डॉ.बाबासाहेब उद्यानापर्यंत गिरणा कॉलनी, अधिकार्यांच्या निवासस्थानांना ताप्ती कॉलनी, नर्स कॉलनी आता इंद्रायणी कॉलनी, 12 बंगला कोयना कॉलनी, फिल्टर रोड, नेहरू रोड, मिशन रोड कृष्णा कॉलनी तर आठ बंगला आता कावेरी कॉलनी म्हणून ओळखला जाईल. डीआरएम कार्यालयासमोरील परीसर पंचगंगा कॉलनी, कंडारी, पीओएच कॉलनी आता पूर्णा कॉलनी म्हणून ओळखली जाईल तर भुसावळ स्टेशन व बसस्थानक परीसर विंध्याचल कॉलनी, न्यू पोर्टर चाळ, मच्छि मार्केटमागील परीसर चांदमारी चाळ, आगवाली चाळ, हद्दीवाली चाळ भागाचे वाघूर कॉलनी तसेच झेडआरटीआय परीसराची सरस्वती कॉलनी यानावाने ओळखल्या जाणार आहे.