भुसावळ-शहरातील खडका रोड भागातील मनियार हॉल जवळील नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अज्ञात समाज कंटकांकडून तोडफोड केल्याची घटना दि.१५ रोजी सकाळी ८ वाजता लक्षात आली. याबाबत बाजारपेठ पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींकडून हि तोडफोड झाल्याचे समोर येत आहे .
बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खडका रोड वरील पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अज्ञात विकृत समाज कंटकांनी दि.१५ रोजी पहाटे रुग्णालायाच्या दोनही दरवाज्यांचे कुलूप तोडून आरोग्य केंद्रात प्रवेश करुन वैद्यकिय अधिकारी यांच्या कक्षातील कॉम्प्यूटर, फोन, टेबल खुर्च्यासह रुग्णालयातील पाण्याचे जार व साहित्यांची फेकाफेक करुन नुकसान केल्याची घटना दि.१५ रोजी सकाळी ८ वाजता लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य सभापती मेघा वाणी, देवेंद्र वाणी, माजी उपनगराध्यक्ष शे.शफी शे अजीज, माजी गटनेता नईम पठाण, सचिन पाटील, परिक्षित बर्हाटे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.आर्शिया रईस शेख (वय ३९,रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या फिर्यादिवरुन बाजारपेठ पोलिसात अज्ञातांविरुद्ध गु.र.नंं. ८७/१८, भा.दं.वि. ४५४, ४५७, ३८०, ४२७, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.