लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे भुसावळ-इगतपुरी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ- इगतपुरी मेमू रेल्वे सेवेला सोमवारी १० जानेवारीपासून सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे स्टेशनवर आज सकाळी ७ वाजता रेल्वे गाडीचे स्वागत करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ-इगतपुरी पॅसेजर रेल्वे मात्र बंद असल्यामुळे चाकरमाने व सामान्य प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती.
यासंदर्भात रेल्वे समितीचे सदस्य विनायक पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे गाड्या सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून भुसावळ-इगतपूरी मेमू रेल्वे सेवाला सुरूवात करण्यात आली आहे.
सोमवारी १० जानेवारी रेाजी सकाळी ७ वाजता भुसावळ -इगतपूरी मेमू रेल्वेला हिरवी झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. जळगाव रेल्वे स्टेशनवर सकाळी रेल्वे गाडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रेल्वे समितीचे सदस्य विनायक पाटील, संदीप कासार, सहाय्यक स्टेशन व्यवस्थापक विनय सिन्हा, टिटीई आर.टी. ठाकूर यांच्यासह आदी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.