विश्वात शांती व मुबलक पावसाकरीता मुस्लिम बांधवांची प्रार्थना
भुसावळ :- भुसावळ शहर व परिसरात हजारो मुस्लीम बांधवांनी रमजान ईद हर्षोल्हासात व आनंदाने साजरी केली. यावेळी विश्वात शांती व मुबलक पावसा करीता मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करून नमाज अदा केली.
राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी रमजान ईदनिनित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता शहर व परिसरातील शासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बुधवार 5 रोजी सकाळी 9 वाजता खडका नजीक असलेल्या ईदगाहवर उपस्थिती देऊन समस्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या .तसेच शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून गळाभेट करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ईदगाह कमेटी मेंबर्स सह शेख शफी शेख अजीज, आशिकखान शेरखान , व शहरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी सर्व मानव जातीला यशस्वी होऊ दे, मुबलक पाऊस पडून शेतक-यांना सुगीचे दिवस येऊ दे, विश्वामध्ये शांती लाभू दे अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांतर्फे करण्यात आली. यावेळी आमदार संजय सावकारे, सहाय्यक पोलीस अधिक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड, यांचेसह नगराध्यक्ष रमण भोळे ,, सचिन चौधरी, तसेच नगरसेवक
पोलीस विभाग अधिकारी व कर्मचारी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते .या सर्वांनी ईदगाह मैदान येथे पुष्पगुच्छव गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
ईदनिमित्त सकाळपासूनच समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह होता. नमाज पठणासाठी आलेल्या सर्व अबालवृद्धांनी नवीन वस्त्र परिधान केले होते . या नंतर घरोघरी जाऊन नातवाईक, आप्तेष्टांच्या भेटी घेवून समाजबांधवांतर्फे शिरखुर्मासाठी निमंत्रण देण्यात येऊन हिंदूबांधवांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. महिला व बच्चे कंपनी यांनी रेशीम व नवनवीन वस्त्र परिधान करून साजशृंगार करन एकमेकांना आनंदाने शुभेच्छा दिल्या.
दुय्यम कारागृहात उत्साहात ईद साजरी
भुसावळ येथील दुय्यम कारागृहात कैद्यांसह अधिका-यांनी ईद उल फित्र सण मोठया आनंदाने व उत्साहात साजरा केला. येथील कारागृहातील काही मुस्लीम कैदी यांनी सुद्धा पवित्र रमजान महिन्यातील रोजा (उपवास) केले होते. आज सकाळी या मुस्लीम बांधव कैदयांसाठी येथील कारागृह अधिकारी एम के खैरगे यांनी कुंजुल इमाम मशिदीचे इमाम साजीद कुर यांना ईद निमित्त नमाज पठण व प्रार्थनेकरिता आमंत्रित केले होते.
यावेळी इमाम साजीद कुर यांनी शहरात अमन व शांती राहावी याकरिता प्रार्थना केली .तसेच उपस्थित कैद्यांना चांगले आचार व विचार आत्मसाद करून वाईट सवयी सोडून चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले. दुय्यम कारागृह अधिकारी एम के खैरगे यांचेसह कर्मचारी यांनी सर्वांना गळाभेट करून शुभेच्छा दिल्या तसेंच व अधिकारी कर्मचा-यांनी केलेल्या या विशेष व उल्लेखनीय कार्याचे सर्व कैदी व मुस्लिम बांधवांनी कौतुक केले.