भुसावळात खाजगी शिकवण्यांविरुद्ध युवासेना आक्रमक

0

नामांकीत शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांचे छुपे कोचिंग ; आंदोलनाचा इशारा

भुसावळ :- शहरासह तालुक्यात नामांकीत शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांसह प्राध्यापकांकडून छुप्या कोचिंगची दुकानदारी सुरू असून कारवाईची जवाबदारी असलेली शिक्षण विभागाची यंत्रणा व महाविद्यालय प्रशासनाने याबाबत तोंडावर बोट ठेवल्याने युवा सेनेने निवेदनाद्वारे ही दुकानदारी तातडीने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवाय संस्थासह महाविद्यालयातील प्राध्यापकांविरूद्ध शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. महाविद्यालय प्रशासनाकडे या शिक्षकांनी खाजगी शिकवणी न घेण्याबाबत हमीपत्र लिहून दिले असून कायद्याचा धाकही या शिक्षकांना आता उरलेला दिसून येत नाही.

गलेलठ्ठ पगारानंतरही कोट्यवधींची वरकमाई
शाळेमध्ये नोकरी करून उर्वरीत वेळेत विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी देऊन कोट्यवधीची वरकमाई शिक्षकांसह प्राध्यापकांकडून सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या लोकांवर लक्ष केंद्रीत करून आता धडक कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. बेकायदा शिकवणी घेऊन पैसे कमावणार्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करा, या आशयाची मागणी गुरुवारी सकाळी 10 वाजता भुसावळ युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परीसरातील विद्यार्थ्यांनी भुसावळ शहरातील गटशिक्षणाधिकारी तसेच विविध शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना केली आहे. कारवाई न करणार्यांची तक्रार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला.

अनुदानीत वर्गांच्या फी मध्ये तफावत
भुसावळमधील प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश फी मध्ये कमालीची तफावत आहे. अनुदानित वर्गांची फी तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये आहे याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. वर्षामागे प्रत्येक महाविद्यालय 4 ते 5 लाख रुपये अतिरिक्त वसूल करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा साठवला जात आहे. शिक्षकांच्या वर कमाईलाही प्राचार्य व मुख्याध्यापकच जबाबदार आहेत. भविष्यात कोणत्याही शाळेचा शिक्षक खासगी शिकवणीद्वारे वरकमाई करताना आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्यांसहह मुख्याध्यापकांची असेल अश्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्यानंतरही प्रत्यक्षात कुणावरही कारवाई झाल्याचे आढळून येत नाही. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांकडून ते खासगी शिकवणी घेणार नाहीत या आशयाचे लेखी हमीपत्र लिहून दिलेले असून ते शाळेच्या दफ्तरी ठेवले आहे त्यावर आपण कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे.’

शालेय शिक्षकांचेच खासगी कोचिंग क्लास
क्लास तसेच शिकवणी घेणारे भुसावळ परीसरात सुमारे 200 शिक्षक आहेत. भुसावळ परीसरात अनुदानीत शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांमधील सुमारे 200 शिक्षक स्वत:चे कोचिंग क्लासेस चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुदानित शाळा-कॉलेजांमध्ये शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम करणार्या आणि त्यासोबतच स्वत:चे कोचिंग क्लास चालविणार्या सुमारे 150 शिक्षकांची यादीच आहे. या यादीत संबंधित शिक्षक, शाळा किंवा कॉलेजांचे नावदेखील आहे. काहींनी त्यांच्या पत्नीच्या नावे शिकवण्या सुरू केल्या आहेत. प्रत्यक्षात नियमानुसार शाळा किंवा कॉलेजांमधील शिक्षकांना खासगी कोचिंग क्लासेस घेता येत नाहीत, या शिक्षकांच्या नावांची यादीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालयात पाठवली जाणार आहे. शिकवणी न लावल्यास प्रात्यक्षिकात कमी गुण देण्याचा इशाराही काही शिक्षक देत असल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, शहर चिटणीस मिलिंद जाधव, प्रसिद्धी प्रमुख लोकेश वारके, उपशहर प्रमुख भूषण सोनार, उपशहर प्रमुख पवन बाक्षे, मृगेन कुलकर्णी, पवन जोशी, शुभम गावंडे, शुभम पाटील, अजय पाटील, शुभम राजपूत, अंशुल भाकरे, शुभम चौधरी, गौरव पवार, निखील महाजन निवेदन देताना उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.