भुसावळात उसनवारीच्या पैशातून सामानाची तोडफोड ; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ | प्रतिनिधी
उसनवारीच्या पैशातून पती-पत्नीने अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत सामानाची तोडफोड केल्याची घटना जामनेर रोडवरील हॉटेल सायलीमागे घडली. या प्रकरणी पती-पत्नीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे.
उसनवारीच्या पैशातून वाद विकोपाला तक्रारदार पूनम राहुल चौधरी (जामनेर रोडवर, हॉटेल सायलीमागे, भुसावळ) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती के.नारखेडे विद्यालयात शालेय पोषण आहाराचे ठेकेदार आहेत. संशयीत आरोपी अमित भगवान खरारे यांचे मेहुणे विशाल हंसकर यांच्याकडून पती राहुल चौधरी यांनी उसनवार 50 हजार रुपये घेतले होते. ते परत देण्याच्या मागणीसाठी संशयीत आरोपी अमित भगवान खरारे व त्याची पत्नी सरीता अमित खरारे (पांडुरंगनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी  घरी येत कुठे गेला राहुल चौधरी, असे म्हणत पैशांची मागणी केली तसेच अनधिकृतरीत्या घरात प्रवेश करून शिवीगाळ केली व सामानाची तोडफोड करण्यात आली. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह घरी आलेली बहिण चेतना तुषार जावळे यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी खरारे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अमित खरारे यास अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.