भुसावळातील व्यापार्‍याची लूट : सुरतचे तिघे आरोपी जाळ्यात

0

भुसावळ (प्रतिनिध) : भुसावळहून जळगावकडे निघालेल्या कापड व्यापार्‍याकडील 50 हजारांची रक्कम लांबवून तिघा संशयीतांनी पोबारा केल्याची घटना 6 मार्च रोजी नाहाटा महाविद्यालयाजवळ घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सुरत क्राईम ब्रँचच्या मदतीने सुरतमधील तिघा भामट्यांच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे. आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर तपास पथक आरोपीना घेवून भुसावळकडे निघाले आहे.

या प्रकरणी युनूस उर्फ अमीन युसूफ शेख, महेश मधुकर सपकाळे, संम्स तबरेज मेहताब अन्सारी (सर्व रा.सुरत) आरोपींना अटक केली असून आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किंमतीची इर्टीगा व 14 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
व्यापारी सुनील उधमदास माखीजा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचे जळगावातील बळीराम पेठेत जय माता दी रेडिमेड नावाचे दुकान असून ते 6 मार्च 2021 रोजी दुपारी 12.45 वाजता दुकानावर जाण्यासाठी 50 हजारांची रोकड घेवून निघाले. नाहाटा चौफुलीवर आल्यानंतर त्यांना पांढर्‍या रंगाच्या इर्टीका कारच्या चालकाने कुठे जावयाचे असे विचारत लिफ्ट देण्याचे नंतर माखीजा यांनी जळगाव जावयाचे सांगितल्यानंतर चालकाने जे भाडे असेल ते द्या व आम्ही नागपूर येथून नाशिक येथे जात असल्याचे सांगितल्याने व्यापारी वाहनात बसले मात्र ओव्हरब्रीज पास केल्यानंतर सुभाष गॅरेजजवळ गाडी थांबवून वाहनात दाटी होत असल्याचे सांगून व्यापार्‍याला खाली उतरवून देण्यात आले. त्याचवेळी जीन्स पँटमधील रोकड तपासली असता ती गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍याने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारच्या क्रमांकावरून आरोपींपर्यंतचा माग काढला व सुरत क्राईम ब्रँचच्या मदतीने शुक्रवारी सुरतमधून आरोपींना पकडले. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी तसेच सुरत क्राईम ब्रांचचे सहाय्यक फौजदार संजय पाटील, सहा.फौजदार रवींद्र माळी यांच्या सहकार्याने आरोपींना अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.