भुसावळ (प्रतिनिधी)- शहरात दिवसागणिक कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून शहरातील अनेक दुकानांमध्ये वाजवीपेक्षा जास्त गर्दी होत असते. फिजीकल डीस्टन्सिंग पाळली जात नाही, त्यामुळे अश्या दुकानदारांना सूचना देऊन सुध्दा ते ऐकत नसतील तर त्यांची दुकाने सील करा, शहरातील सुरू असलेल्या जीम बंद करा, अश्या सूचना प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांनी आयोजीत बैठकीत दिल्या. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, भुसावळकरांनो लॉक डाऊनची वेळ आणू नका, असे संकेत प्रांताधिकारी सुलाणे यांनी दिले.
प्रांत कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल.े यावेळी तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, डॉ.किर्ती फलटणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे यांच्यासह पोलिस अधिकारी, पालिकेचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
प्रांताधिकारी यांनी सांगितले की, शहरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे. शहरात तोंडाला मास्क लावण्याबाबत वारंवार सूचना केल्यावर सुध्दा बहूसंख्य नागरीक, विक्रेते हे मास्कचा वापर करीत नाही. यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यासाठी पालिकेतर्फे भरारी पथके स्ट्राँग करण्याच्या सूचना केल्यात. शनिवारी सकाळपासून शहरातील विविध भागात पालिका, पोलिस पथकांकडून तोंडाला मास्क नसणे, गर्दीच्या ठीकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. विशेष करून बॅकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, तेथे फिजीकल डीस्टन्सिंग पाळली जात नसेल तर प्रत्येकाला दंड करावा आणि बँकांना समज द्यावी. वारंवार सूचना देऊन सुध्दा जे दुकानदार ऐकत नसतील गर्दीमध्ये फिजीकल डीस्टन्सिंग ठेवत नसतील त्यांची दुकाने सील करा, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या गाईड लाईनीची सक्तीने अंमलबजावणी करावी, अश्या सूचना दिल्यात.
शहरात ज्या जीम सुरू असतील त्या जीम बंद करा, गर्दीची ठिकाणे बंद करा, कोरोना वाढत असल्याने ही प्रक्रीया तात्काळ करावी, अश्या सूचना देण्यात आल्या आहे. खाद्य पदार्थाच्या गाड्यावर सुध्दा गर्दी असल्यास आणि फिजीकल डीस्टन्सिंग नसल्यास कारवाईचे संकेत दिले आहे.