भीषण आगीत अमृत योजनेचे पाईप जळाले

0

आयएमआर कॉलेजमागील घटना, मक्तेदाराचे मोठे नुकसान

जळगाव, दि. 14-
अमृत योजनेतील पाईपलाईन सोमवारी दुपारी आगीत जळून खाक झाल्याची घटना आयएमआर कॉलेजमागील मैदानावर घडली. पोलीस आणि मैदानावरील तरुणांच्या सामूहिक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
अमृत अंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाईप टाकण्यात येत आहेत. त्याचा साठा आयएमआर कॉलेजमागील मैदानावर ठेवण्यात आला आहे. त्याला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या घटनेत पाईपचे 15 बंडल जळून खाक झाले, तर उर्वरित 15 बंडल वाचविण्यात यश आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, काही टारगट मुलांनी जळती सिगारेट मैदानातच टाकली. त्यामुळे वाळलेले गवत पेटून पाईपांना आग लागली असावी. आगीतील धुराचे लोट खोटेनगर ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या भागातून दिसत होते.
आगीची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाना तायडे, प्रशांत कंखरे, रामेश्वर ताठे, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुल पाटील पहेलवान व इतर तरुणांच्या मदतीने पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाला माहिती मिळून आग नियंत्रक बंब घटनास्थळी पोहोचण्यात बराच वेळ लागला. या घटनेत अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती अमृतचे प्रकल्प व्यवस्थापक आर. बी. पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.