जळगाव- स्व. रतनलाल बाफना यांना श्रद्धांजलीसाठी उद्या (दि. २२) संभाजी राजे नाट्यसंकुलात आयोजित भावपुष्प कार्यक्रमासाठी आज संपूर्ण बैठक व्यवस्था आणि इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन उद्याचा कार्यक्रम सर्व प्रकाराचे नियम पाळून होणार आहे.
भावपुष्प कार्यक्रमासाठी नाट्यगृहात सायंकाळी ५.४५ वाजता स्थानापन्न होणे आवश्यक आहे. सभागृहातील निम्म्याच खुर्च्यांचा वापर केला जाणार आहे. एक खूर्ची सोडून बैठक व्यवस्था असेल. इतर खुर्च्या टैग लावून बंद केलेल्या असतील. सभागृहात प्रवेशापूर्वी हातांवर सेनिटायझर फवारणी होईल. शिवाय मास्क घातलेल्या व्यक्तिंनाच प्रवेश दिला जाईल.
रतनलालजी बाफना यांनी व्यापार-उद्योग क्षेत्रासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या पुढाकारातून केलेल्या वैविध्यपूर्ण कार्याविषयी संपूर्ण जळगावकरांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. भारती कैलास सोनवणे, शहराचे आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती सेवा समुहाचे प्रकल्प प्रमुख भरत अमळकर व प्रा. डी. डी. बच्छाव आहेत.
स्व. रतनलालजी हे वेळेचे पालन करण्याबाबत आग्रही असत. त्यामुळे उद्या कार्यक्रम वेळेवर सुरू करुन अवघ्या ९० मिनिटात आटोपशीर करण्यासाठी आयोजकांचा प्रयत्न आहे. यासाठी मान्यवर उपस्थितांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. श्रद्धांजलीपर व्याख्याने ही केवळ ३ मिनिटांची असतील. काही मान्यवरांचे ऑडिओ व्हिज्युअल संदेश असतील. स्व. रतनलालजींचे कार्य दाखविणाऱ्या चित्रफित असतील. स्व. रतनलालजी यांच्याविषयी जळगावकरांची कृतज्ञता दर्शविण्यासाठी हा सर्व समावेशक कार्यक्रम स्व. रतनलालजी बाफना स्नेहीजनांनी आयोजित केलेला आहे.

