नवी दिल्ली ;- अमेरिकेतील निवडणुकीत फेसबुकचा डेटा वापरण्यात आल्याच्या रिपोर्टवर चिंता व्यक्त करताना फेसबुकचा सीआईओ मार्क झुकेरबर्ग याने आमची संस्था भारतासहित जगभरातील निवडणुकांमध्ये अखंडत्व राखण्यासाठी बांधिल आहे असं सांगितलं आहे. सीएनएनला दिलेल्या मुलखातीत मार्क झुकेरबर्गने रशियासारख्या देशांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं मान्य केलं. सोबतच असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपल्या संस्थेने कोणती पावलं उचलली याची माहितीही त्याने दिली.
‘आमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे. २०१८ अमेरिकेचा मध्य कालावधी असून आमच्यासाठी हा खूप मोठा मुद्दा असून, त्याच्यावर फोकस असणार आहे. पण याव्यतिरिक्त भारतात पुढील वर्षी मोठी निवडणूक होत आहे, ब्राजिलमध्येही निवडणूक आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये महत्वाच्या निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांचं अखंडत्व फेसबुकर सुरक्षित राहिल ही आमची जबाबदारी असून यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु’, असं मार्क झुकेरबर्गने सांगितलं आहे.