मँचेस्टर – वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान झालेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं. रोहित शर्माची खणखणीत १४० धावांची खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत केलं आणि पाकिस्तानविरोधात एकही न सामना गमावता वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच सव्वाशेर असल्याचंही टीम इंडियानं दाखवून दिलं.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी पाकचा निर्णय फोल ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताने ५० षटकात ५ बाद ३३६ धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव ४० षटकात ६ बाद २१२ धावांत रोखला गेला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या ५ षटकात १३६ धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. मात्र त्यांना केवळ ४६ धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.