बर्मिंगहॅम – विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध बांगला देश असा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. तत्पूर्वी सलामीवीर रोहित शर्माचे शानदान शतक (१०४), लोकश राहुलचे अर्धशतक (७७) आणि ऋषभ पंतच्या (४८) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रतिउत्तरात बांगलादेशाने जिगरबाज खेळ करत सर्वबाद २८६ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशतर्फे शाकिब अल हसनने ६६, तर शब्बीर रेहमानने ३६ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सैफुद्दीनने अखेरपर्यंत फटकेबाजी करत भारतीय क्रिकेट रसिकांचा श्वास रोखून धरला होता मात्र भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोक्याच्या शेवटून दुसऱ्या षटकामध्ये भेदक मारा करत बांग्लादेशच्या उरलेल्या २ फलंदाजांना घराचा रस्ता दाखवला. एका बाजूने मोहम्मद सैफुद्दीनने अर्धशतकी खेळी केल्याने बांगलादेश हा सामना अंतिम षटकापर्यंत खेचून न्हेण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र बुमराहने बांग्लादेशच्या इराद्यांवर पाणी फेरले.

