भाजप आज पहिली यादी जाहीर करणार : महाराष्ट्रातील 7 नावांचा समावेश

0

नवी दिल्ली :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून काही उमेदवारांची नावे जाहीर केली. पण, सर्वात मोठा आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने मात्र अद्याप देखील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी आपल्या पहिल्या १०० ते १३० उमेदवाराची यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची केंद्रीय निवड समितीची बैठक होईल व त्यानंतर ही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या यादीत कुणाला संधी मिळणार? कुणाचा पत्ता कट होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठीच्या जागांसाठी १८ मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या यादीत बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील अनेक उमेदवारांची नावे असतील, असे सांगितले जाते.

निवड समितीच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात असलेल्या ९१ जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. त्यात महाराष्ट्रातील सात, उत्तर प्रदेश ८, आंध्र प्रदेश २५ आणि तेलंगणच्या १७ जागांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या निवडणूक समितीची ही पहिली बैठक असेल. पक्षाच्या येथील मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज आदी उपस्थित राहतील.

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 नावांचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी , चंद्रपूर – हंसराज अहिर, गडचिरोली-चिमूर– अशोक नेते, भंडारा-गोंदिया – परिणय फुके किंवा रचना गहाणे, वर्धा – रामदास तडस, जालना–रावसाहेब दानवे, बीड – प्रीतम मुंडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.