इटानगरः- आगामी निवडणुकीच्या आधीच अरुणाचल प्रदेशात भाजपाला मोठा झटका बसला आहे. एका अहवालानुसार, पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील भाजपाचे दोन मंत्री आणि 12 आमदार मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी)मध्ये सहभागी झाले आहेत. गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकार गामलीन आणि इतर विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी एनपीपीमध्ये प्रवेश केला आहे.
वाई म्हणाले, भाजपाने खोटी आश्वासने देऊन लोकांच्या मनातील पहिल्यापासून असलेला विश्वास गमावला आहे. आम्ही फक्त निवडणूक लढणार नाही, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचं सरकार बनवू. तसेच पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए)चा एक आमदार आणि भगवा पार्टीचे 19 नेते एनपीपीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.