नवी दिल्ली :- अमित शहा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर आता भाजपाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाच्या “एक व्यक्ती-एक पद’ या धोरणानुसार अमित शह हे लवकरच भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी ज्यांच्या नावांची चर्चा आहे, त्यामध्ये भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नड्डा यांचे नाव नव्हते. तेंव्हापासूनच त्यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. पक्षाच्या वरिष्ठांबरोबर संघाच्या मर्जीतील नड्डा यांची स्वच्छ प्रतिमा यामुळेही त्यांच्या नावाची वर्णी लागू शकते.
अध्यक्षपदासाठी दुसरे नाव म्हणजे भाजपचे सरचिटणीस आणि राज्यसभेतील खासदार भुपेंद्र यादव यांचे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी बिहार आणि गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी काम बघितले होते. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित बहुमत मिळाले आहे. त्यांच्याशिवाय नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांचे समकालीन ओ.पी.माथुर यांच्याकडेही संभाव्य अध्यक्ष म्हणून बघितले जात आहे. मूळचे राजस्थानातील असलेले माथुर गुजरातचे प्रभारी आहेत. 2007 आणि 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोदींबरोबर काम केले आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये भाजपकडून नवीन प्रदेशाध्यक्ष निवडले जाणे अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशात महेंद्रनाथ पांडे आणि बिहारमध्ये नित्यानंद राय यांच्यासह महाराष्ट्रात रावसाहेब दानवे या प्रदेशाध्यक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.