ना. महाजनांच्या जळगाव संपर्क कार्यालयात झाली सेना भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
जळगाव : नुकतीच झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपविषयी नाराजी व्यक्त केली होती . मात्र आज सायंकाळी ना. गिरीश महाजन यांनी त्यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात सेना भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली . यावेळी सेनेची नाराजी दूर झाली असल्याने सेना भाजप उमेदवारांचा एकदिलाने प्रचार करणार आहे. यासाठी येत्या ९ तारखेनंतर दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमच्यावर पाचोऱ्यात ३५३ दाखल करण्यासाठी संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावतात, जिल्हा परिषदेत कॉग्रेसच्या सदस्यासोबत शिवसेना सोडून सत्ता भाजपने स्थापन केली, निधी देण्यात दुजाभाव करण्यात येतो, निवडणुकीत कामापूर्ती शिवसैनिक व पदाधिकऱ्यांचा वापर केला जातो, ज्या भाजपने नेहमी आमच्यावर अत्याचार केला , कोर्टात वेगवेगळी प्रकरणे, खटले सध्या सुरू आहे, तर त्यांच्या समर्थनात मते कशी मागायची कोणत्या तोंडाने जनते समोर जायचे अशा अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या होत्या.
यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ,संपर्क प्रमुख संजय सावन्त , आ. राजूमामा भोळे , जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , महानगर प्रमुख शरद तायडे , माजी महापौर ललित कोल्हे , विष्णू भंगाळे , सुनील महाजन आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले कि , गिरीश महाजन यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत . आमच्यात नाराजी नसली तरी तालुक्यांमध्ये नाराजी आहे ती लवकरच दूर होईल असे ना. पाटील यांनी सांगितले. राज्यासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती आहे ती तोडण्यात येऊन शिवनेसह मित्रपक्षाला सामावून घेतले जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . यावेळी मनपात शिवसेनेला सामावून घेत पदे दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.