भाजपाचे धक्कातंत्र ~ खा. रक्षाताई खडसेंना बढती

0

खा. रक्षा खडसे यांना भाजप संघटनेत बढती

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजप संघटना विस्कळीत झालीय. तिच्यात मरगळ आलीय. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची मर्यादा पक्षश्रेष्ठींना दिसून आल्याने जळगाव जिल्ह्यासाठी खा. रक्षा खडसे यांच्या रूपाने नवा चेहरा दिला जातोय.

एका दगडात दोन पक्षी मारण्याचा घाट

खा. रक्षा खडसे यांना नेतृत्वात बढती देण्यामागे पक्षश्रेष्ठींकडून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निशाणा साधला जातोय. एकतर एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेले असले तरी त्यांच्या सूनबाई खा. रक्षा खडसे खंबीरपणे भाजपचे कार्य करताहेत. त्यामुळे एकनाथराव खडसे यांना हा धक्कातंत्रच म्हणावा लागेल. त्याचबरोबर माजी मंत्री गिरीश महाजन यांना रक्षा खडसेंच्या पक्षातील बढतीने आपोआप शह दिला जातोय. कारण गिरीश महाजन यांची पक्षाच्या संकटमोचकाची प्रतिमा मलिन झालीय.

भाजपा रसातळाला

जळगाव महानगरपालिकेत भाजपला 35 वर्षानंतर सत्ता मिळाली. दोन तृतीयांशपेक्षा जास्त पाशवी बहुमत भाजपला मिळाले असतंना सुध्दा जळगाव महापालिकेतील सत्ता राखण्यात ते अपयशी ठरले. परिणामी जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला. तीच अवस्था धुळे महापालिकेची सुध्दा होते आहे. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रावेर विधानसभा मतदार संघात कै. हरिभाऊ जावळे यांचा पराभव गिरीश महाजनांचे मित्र समजले जाणारे भुसावळच्या अनिल चौधरींच्या बंडखोरीमुळे झाला. अनिल चौधरींवर डोळे जरी वटारले असते तरी त्यांनी माघार घेतली असती पण तसे झाले नाही. त्यामुळे कै. हरिभाऊ जावळें सारखा भाजपचा निष्ठावान कार्यकर्त्यांची हार झाली. भाजपा रसातळाला जाण्यासाठी गिरीश भाऊं जबाबदार असल्याचे दबक्या आवाजात बोललं जातं आहे.

जिल्ह्यात भाजपाची हानी

2019 च्या खासदारकीच्या निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांना अधिकृत जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्याच्या हेकेखोरपणामुळे भाजपातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले. त्याचाच परिणाम जिल्ह्याचे तत्कालिन भाजप अध्यक्ष उदय वाघ यांच्यावर झाला. त्यामुळे भाजपची मोठी हानी झाली.

बीएचआर आणि जामनेर बांधकाम घोटाळा संशयाची सुई गिरिषभाऊंकडे

आता तर जिल्ह्यातील बीएचआरचा कोट्यवधीचा घोटाळा आणि जामनेरचे जि.प.च्या जागेवर बांधण्याच आलेल्या कोट्यवधी घोटाळ्याशी त्यांचा संबंध जोडला जातोय. त्यामुळे गिरीश महाजन जळगाव जिल्हा भाजपचे नेतृत्व करण्याच्या नैतिकतेविषयी भाजपश्रेष्ठींमध्ये शंका निर्माण झाल्याने खा.रक्षा खडसे यांना बढती दिली जात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांना भाजपश्रेष्ठी या बढतीने शह देतील असं चित्र तयार होते आहे.

खा. खडसेंचे समर्थ नेतृत्व

महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे चक्काजाम आंदोलन झाले. जळगाव जिल्ह्यातील चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व खा. रक्षा खडसे यांनी केले. तेही समर्थपणे नेतृत्व केले. जिल्ह्यातील या चक्का जाम आंदोलनात भाजपचे संकटमोचक म्हणवले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन हे कोठेही दिसले नाहीत. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात खा. रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

खडसे परिवारात कलह

ओबीसींच्या वक्तव्यावरून खा. रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या नणंद भावजयांमध्ये झालेला वाद चांगलाच रंगला. त्याचा परिणाम एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबियात कलह निर्माण झाला. तो तसा कलह होणे भाजप श्रेष्ठींना अपेक्षितच होते. इतकचे नव्हे तर एकनाथराव खडसे यांना शह देण्यासाठी खा.रक्षा खडसे यांना केंद्रात मोठे पद देण्याचे घाटत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते. सध्या केंद्रातील मोदी सरकार मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून खा. रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागेल असेही सूत्रांकडून माहिती मिळते. सुदैवाने तसे झाले तर खा. रक्षा खडसे यांच्या रूपाने जिल्ह्यातील महिलेला मंत्रीपदाचा मान मिळेल. मंत्रीपदासाठी खा. रक्षा खडसे लायक आहेत. कारण कोथळी गावच्या सरपंचपदापासून जिल्हा परिषद पदाधिकारी ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. खासदारकीची त्यांची दुसरी टर्म असून एक अभ्यासू खासदार आणि जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. तसेच ते प्रश्न राज्य व केंद्रातील सरकारकडे मांडून सोडवून घेण्याचा त्यांचा सातत्याने असलेला प्रयत्न जिल्हावासीयांना ज्ञात आहे. तसेच एवढे वर्षे राजकारणात असून त्यांना कसलाही डाग लागलेला नाही. अद्याप कोरी पाटी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे.

भाजपला नवसंजिवनी

रक्षाताई यांच्या पक्षसंघटनेतील बढतीमुळे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झालेला आहे.त्यांची बढती जिल्ह्यातील भाजपला नवसंजिवनी प्राप्त करून देईल काय? याचे उत्तर येत्या काळात मिळू शकेल. परंतु जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमधील मरगळ जाऊन उत्साह निर्माण झाला आहे एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.