मुंबई : चालू वर्षात म्हणजेच २०१८-१९ या कालावधीत भारतीय जनता पक्षाला एकूण 800 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी ही माहिती भाजपने निवडणूक आयोगाला दिली. या माहितीनुसार भाजपला यंदा चेक आणि ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून एकूण 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली आहे. तर काँग्रेसला फक्त 146 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.
भाजपला सर्वाधिक देणगी टाटा समूहद्वारे मिळाली असून ती 356 कोटी रुपये इतकी आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रानुसार भारतातील सर्वाधिक कमाई करणारी संस्था द प्रुडेंट ट्रस्टने भाजपला 67 कोटी रुपयांची देणगी दिली. तर याच संस्थेने काँग्रेसला 39 कोटी रुपयांची देणगी दिली. या ट्रस्टमध्ये भारती ग्रुप, हीरो मोटोकॉर्प, जुबिलियेंट फूडवर्क्स, ओरिएंट सीमेंट, डीएलएफ, जेके टायर्स यासारख्या कंपन्यांनी आपला वाटा दिला आहे.
काँग्रेसला एकूण 146 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यामध्ये 98 कोटी रुपये अशाच ट्रस्टकडून काँग्रेसला मिळाले आहे.
भाजपला एकूण 800 कोटी रुपयांमधील 470 कोटी रुपये विविध संस्थांकडून मिळाले आहेत. आदित्य बिर्ला समुहाकडून भाजपला 28 आणि काँग्रेसला 2 कोटी रुपये देणगी देण्यात आली आहे.