भाजपला धक्का.. जेडीसीसीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्चित  झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीने सर्व जागांवर तयारी करण्याच्या भाजपच्या दाव्याला धक्का देण्याचे काम केले आहे.

आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित  झाली असून याबाबत नंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आजच भाजपने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा केल्यानंतर एका तासातच महाविकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

यामुळे महविकास आघाडीचे यश मानले जात आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत जाहीर होईल. त्या वेळी अधिक चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या आमदार चिमणराव पाटील हे ९ वेळा संचालकपदी निवडून आले  आहेत. तर त्यांची बिनविरोधची ही तिसरी टर्म असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार हे सुध्दा तिसऱ्यांदा बिनविरोध होत आहेत. तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येत आहेत.

संजय पवार, अमोल पाटील आणि चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाल्यानंतर जिल्हा बँकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संजय पवार, अमोल पाटील, विजय भास्कर पाटील, ज्ञानेश्‍वर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here