जळगाव : जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. हा भाजपासोबतच जळगावमध्ये ज्यांचं प्रस्थ मानलं जातं, ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं मोठं अपयश म्हटलं जात आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
खडसे म्हणाले की, जळगावच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली होती. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. यामुळे नगरसेवक आधीच नाराज होते. त्यांना फोडण्यासाठी फार काही प्रयत्न करावे लागले नाहीत. तर हा पराजय गिरीश महाजन यांच्या गर्विष्ठपणाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. महाजन यांनी जळगावकरांना भूलथापा दिल्या. त्यांनी दोन-चार कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कामे करण्याचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. शहरातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. यातच ते नगरसेवकांशी अतिशय गर्विष्ठपणे बोलत असल्याचा भाजपला फटका बसल्याचे खडसे म्हणाले.
नगरसेवकांना तुच्छ लेखणं, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणं हे होत होतं. त्यामुळे नगरसेवकांना फार आग्रह करावाच लागला नाही. यापैकी बरेच जण महिन्याभरापासून माझ्यामागे फिरत होते. गिरीश महाजनांविषयी प्रचंड नाराजी होती” असं ते म्हणाले.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३५ मते मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा विजय सुकर झाला.