भवानी मातेच्या जयघोषात निघाल्या बारागाड्या

0

मेहरूण, पिंप्राळ्यात जनसागर लोटला : संपूर्ण गाव परिसरात चैतन्यमय वातावरण

जळगाव, दि.18 –
शहरातील जुना ग्रामीण भाग असलेल्या मेहरूण आणि पिंप्राळा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अक्षयतृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील चैतन्यमय वातावरणात बारागाड्या ओढण्यात आल्या. भवानीमातेचा जयजयकार करीत परिसरात भक्तीचा जागर होत होता.
मेहरूणला आले यात्रेचे स्वरूप
अक्षय्यतृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त बारागाड्या ओढण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सायंकाळी 7.00 वाजता भगत मधुकर वाघ यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी महापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर नगरसेवक सुनिल महाजन, नगरसेवक इक्बाल पिरजादे, गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, भुषण सोनवणे, अमोल सोनवणे, आदींसह उपस्थिती होती. सदोबा वेअर हाऊस पासून ते भवानी मातेच्या मंदिरापर्यंत ही बारागाडी ओढण्यात आली. भगत मधुकर वाघ हे गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बारागाड्या ओढत आहे. भवानी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित बारागाड्याला मेहरुण परिसरात लहानग्यापासून अबालवृध्दांचा जल्लोष पहायला मिळाला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी विशेष खबरदारी घेतलेली होती. भवानी मातेच्या जयघोषात बारागाड्यांचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. बारागाड्या उत्सवानिमित्त परिसराला यात्रेस्वरुप प्राप्त झाले होते.
पिंप्राळा गावात जल्लोष
भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त पिंप्राळ्यात गुलाल अन् भंडारा उधळून बारागाड्या ओढण्यात आल्या. सुरुवातीला ध्वजकाठीचे विधिवत पुजन झाले. त्यानंतर भगत हिलाल बोरसे यांच्यासह भक्तांनी ध्वजासोबत भवानी मातेच्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर आ. राजूमामा भोळे, पोलिस पाटील विष्णू पाटील यांच्या हस्ते बारागाड्यांचे पूजन करण्यात आले. यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदिक्षण मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या उत्सवामुळे परिसरात सर्वत्र भक्तीमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. यशस्वीतेसाठी भगत भाऊलाल भोई, आनंदा बोरसे, सुकलाल चौधरी, दिलीप कोळी, गोविंदा बोरसे यांच्यासह पुरुषोत्तम सोनार, जगन्नाथ मिस्त्री, दामू भिल, सुभाष पाटील, भागवत मिस्त्री, दिपक मिस्त्री यांनी परिश्रम घेतले. भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त शहरातील पिंप्राळा उपनगरात बारागाड्या ओढण्यात आल्या. हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरीक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. विविध सामाजिक संस्था व परिसरातील नागरीकांतर्फे पाणी व सरबत वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.