चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील खडकीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतूक गाडीला भरधाव टाटा कंपनीच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पातोंडा गावाजवळ घडली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील खडकी येथील राकेश दत्तू देसले (वय २९) हा मालवाहतूक गाडी चालवित (क्र. एम.एच४१ जी ६५६७) खडकी गावाच्या दिशेने जात असताना पातोंडा गावाजवळील वळणावर चाळीसगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा कंपनीच्या गाडीने (क्र. एम.एच.०४ इ.एल. २८७०) जोरदार धडक दिली. या अपघातात राकेश दत्तू देसले याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पातोंडा गावाजवळील वळणावर घडला.
हा अपघात घडताच अज्ञात चालक हा फरार झाला आहे. राकेश देसले यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रतन श्रीपत पाटील रा. खडकी ता. चाळीसगाव याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, १३४ (बी) व मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास अनिल अहिरे हे करीत आहेत.