भरधाव आयशरने दुचाकीला उडविले ; दांपत्य जागीच ठार
एक जण गंभीर ; अमळनेर जवळील हेडावे रस्त्यावरील घटना

अमळनेर लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर शहरालगत असलेल्या हेडावे रस्त्यावर गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात एका भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्दैवी घटनेत विश्वनाथ हिम्मत भिल आणि त्यांच्या पत्नी ज्योतिबाई विश्वनाथ भिल (दोघेही रा. एकरुखी, ता. अमळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातात बाळू साहेबराव पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या भीषण अपघातामुळे एकरुखी गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.


