भडगावात बोगस सोयाबीन बियाणे रक्कम देण्यास टाळाटाळ

0

भडगाव (सागर महाजन) : भडगाव शहरासह तालुक्यात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच फसवणूक झालेली आहे.

भडगाव तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीनचा पेरा केलेला आहे . संपूर्ण तालुक्यासह पेठ भागातील व गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे हे बोगस निघालेले आहे . कोहीनूर कंपनीचे हे सोयाबीन बियाणे होते . विविध कृषी केंद्रावरून आणि पेठ भागातील अथर्व एजन्सी या कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांनी कोहिनूर कंपनीचे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. प्रतिबॅग २३०० रुपये प्रमाणे कृषी केंद्रावरून बियाणे खरेदी करून ते बियाणे शेतात पेरले. मात्र पेरणीनंतर हे बियाणे काही शेतकऱ्यांचे ५ ते १० टक्के उगवले तर बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही , काही शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवल्यानंतर खूप वाढले पण त्याला शेंगा कमी प्रमाणात लागल्या . आता सोयाबीन काढणी चालू आहे पण उत्पन्नातही घट येत आहे .त्यामुळे या शेतकऱ्यांची चांगलीच फसवणूक झालेली असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले.

ऐवढे महाग कोहीनूर या नामांकित कंपनीने बियाणे खरेदी करूनही ते उगवले नाही . कंपनीने अशा प्रकारचे बोगस बियाणे बाजारात आणूण आणि कृषी केंद्रवाल्यांनीही असे बोगस प्रतिचे बियाणे विकून दोघांनीही आपली कमाई करुन शेतक-यांची चांगलीच फसवणूक केलेली आहे.

या बोगस बियाणे संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती कृषी विभाग यांचेकडे तक्रारी केलेल्या आहेत . मात्र या तक्रारीचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही . कृषी विभागाने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंचनामे केले . त्या पंचनाम्यातही गौडबंगाल आहे .सदर बोगस बियाणे पेरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले .बियाणे , पेरणी , मटेरिअल आणि झतर खर्च शेतकऱ्यांचा वाया गेला. तो  खर्च तर गेलाच पण आता बियाणेचे पैसेही देण्यास कंपनी टाळाटाळ करताना दिसत आहे . शेतकरी वर्ग बियाणेचे पैसे घेण्यासाठी कृषी केंद्रावर फिरत आहेत , कंपनीवाल्यांशी संपर्क साधत आहेत मात्र त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे .काही शेतकऱ्यांना बियाणेचे पैसे दिले जात आहेत मात्र ते पैसे देतानाही काही रक्कम कापून घेतली जात आहे . शेतकऱ्यांनी २२०० , २२५० , २३०० या दराने प्रति बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केलेले आहे .कंपनी मार्फत परतावा देताना चक्क ३०० ते ३५० रुपये कपात करून १९५० व २००० रूपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत . तसेच जेवढ्या बॅगा घेतल्या तेवढ्या बॅगाचे पैसे न देता १ ते २ बॅगा कमी करून पैसे दिले जात आहेत . बऱ्याच शेतकऱ्यांना अजून काहीच परतावा मिळाला नाही . कोहीनूर सोयाबिन कंपनीने बोगस बियाणे तयार करून शेतकऱ्यांची चांगलीच फसवणूक केलेली आहे . आणि आता बियाणे रक्कम देतानाही चांगलीच टाळाटाळ करीत आहे .बरेच शेतकरी कंपनीविरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत .त्यात कैलास रामदास नरवाडे , श्रीकांत पंडीत नरवाडे , रावसाहेब मुरलीधर पाटील , बारकू भिमराव पाटील , चंद्रकात बबन ठाकरे , प्रदिप भाऊराव पाटील , अरूण श्रावण गंजे , भरत लोंढू पाटील , प्रमिला पंढरीनाथ मराठे यांचे सह अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवलेच नाही अशा आशयाच्या तक्रारी दिलेल्या आहेत.

तरि कृषी विभागानेही आपले झोपेचे सोंग घेणे बंद करून या बोगस सोयाबीनचे बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना बियाणेची पूर्ण रक्कम व इतर नुकसान भरपाई मिळवूून देणेसाठी कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.