भक्तिभावात साई पालखी शिर्डीकडे रवाना

0

भक्तिभावात साई पालखी शिर्डीकडे रवाना

ओम साई मित्र मंडळाचा उपक्रम; पालखी मार्गावर मोबाइलच्या दुष्परिणामांवर जनजागृती

जळगाव येथून शिर्डीकडे जाणारी ओम साई मित्र मंडळाची साई पालखी रविवारी (दि. २८ डिसेंबर) भक्तिभावाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात रवाना झाली. ‘श्री साईराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून, फुलांची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि भाविकांची मोठी गर्दी यामुळे पालखी प्रस्थान सोहळा भक्तिमय झाला होता.

या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे माजी प्राचार्य नीलकंठ गायकवाड, माजी खासदार उल्हास पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, सीमा भोळे, सुनील झंवर, लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर, माजी नगरसेविका शोभा बारी, परेश कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी साई पालखीचे पूजन करून भाविकांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

पालखी शोभायात्रेची सुरुवात जळगाव बळीरामपेठ येथील साई मंदिरातून झाली. त्यानंतर पिंप्राळा मार्गे पाळधी साईबाबा मंदिर येथे पहिला मुक्काम ठरवण्यात आला आहे. पुढे ही पालखी एरंडोल, कासोदा, भडगाव, कजगाव, वाघळी, चाळीसगाव, नांदगाव, येवला, कोपरगाव या मार्गाने प्रवास करत शिर्डी येथे पोहोचणार आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत, अल्पोपहार व सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेषतः मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम या विषयावर भाविकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, मोबाइलचा अतिरेक मुलांसाठी कसा घातक ठरू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. भक्तीबरोबरच सामाजिक भान जपण्याचा हा उपक्रम भाविकांकडून कौतुकास्पद मानला जात आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले, तर आभार विजय झंवर यांनी मानले. पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रवी हसवाल, उपाध्यक्ष गजानन बोरकर, सचिव विजय झंवर, कोषाध्यक्ष किशोर देशमुख, सागर मणियार, राजू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भक्ती, शिस्त आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधणारी ही साई पालखी जळगावकरांसाठी श्रद्धा आणि जनजागृतीचा अनोखा अनुभव ठरत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.