कासोदा ता ,एरंडोल | प्रतिनिधी
बौद्धिक गर्विष्ठता ,उद्धटपणा व स्वार्थांधता हा तरुण पिढीचा त्रिदोष ” असे मार्मिक प्रतिपादन निवृत्त आदर्श शिक्षक भास्कराव पाटील यांनी केले .आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त तरसोद शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांनी आयोजित केलेल्या अनौपचारिक ज्येष्ठांच्या सत्काराप्रसंगी मार्गदर्शन करतांना पाटील बोलत होते. तरसोद शाळेचे निवृत्त आदर्श शिक्षक भास्करराव पाटील (वय ७८ वर्ष )यांचा विजय लुल्हे यांनी शाल ,श्रीफळ व वाफेचे मशीन यांसह गांधीजींचा ‘ युगपुरुष ‘ विशेषांक देऊन भावपुर्ण सत्कार केला. याप्रसंगी सौ . बेबाबाई पाटील व पुर्वा पाटील उपस्थित होते. मार्गदर्शनात पुढे पाटील म्हणाले की,” आजची तरुण पिढी पाश्चिमात्यांच्या स्वैर जीवनशैलीच्या अधीन झाल्याने भारतीय संस्कृती व वैभवशाली परंपरेचा झपाट्याने ऱ्हास होत आहे यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भगवान देवरे यांच्या मातोश्री . गं .भा . मैनाबाई देवरे (वय ८५ वर्ष ) आणि माजी सरपंच सौ . मनिषा काळे यांच्या सासू कलावती काळे ( वय वर्ष ६६ ) यांचा गणपती मंदिर संस्थान तरसोदचे विश्वस्त निवृत शिक्षक सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला . सुधाकर सोनवणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,” आजच्या तरूण पिढीने आपल्या मुलांना योग्य वेळी संस्कार केले नाही तर ते स्वैराचारी होऊन संवेदनशून्य होतील .परिणामी दुर्दैव्याने पुढील पिढीत फक्त नर आणि मादी एवढेच नाते शिल्लक राहील .”कोविड महामारीच्या भयग्रस्त वातावरणात निर्भयपणे शिक्षक विजय लुल्हे यांनी कृतज्ञतापूर्वक तरसोद कर्मभुमीतील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्ववान ज्येष्ठांचा निवासस्थानी जाऊन सत्कार करीत त्यांच्या दिर्घायुष्याबद्दल अभिष्टचिंतन करून शुभाशिर्वाद घेतले . अनपेक्षित झालेल्या ह्रद्य सत्काराने ज्येष्ठ मंडळी भारावून गेली . या उपक्रमामुळे शिक्षक लुल्हे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .सत्कारा प्रसंगी ज्येष्ठ मंडळी . अमितबाई सावकारे, रजुबाई देवरे , छायाबाई अलकरी, सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे, आत्माराम सावकारे , अतुल अलकरी मान्यवर उपस्थित होते .