‘लोकशाही’चा दणका
बोदवड (सुनिल बोदडे) – बोदवडात ओपन स्पेस’ धनदांडग्यांच्या घश्यात या मथळ्याखाली दै.लोकशाहीने दि.17 रोजी बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची दखल बोदवड नगरपंचायत प्रशासनानं घेतली असून शहरातील ‘ओपन स्पेस’ चे रेकॉर्ड तयार करणं सुरू असून लवकरच हे ओपन स्पेस शासनदरबारी जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दै.’लोकशाही’ शी बोलतांना दिली.
बोदवड नगरपंचायतीच्या हद्दीत असलेले बहुतेक मोकळे भुखंड काही धनदांडग्यांनी आपल्या मालकीचे समजून हडप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बोदवड ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना मनमानी कारभार चालवीत शहरातील काही तथाकथित धनदांडग्यांनी माजी सरपंच,सदस्य यांना हाताशी धरून बहुतेक ‘ओपन स्पेस’ बळकावले आहेत तर काहींनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून आपल्या मर्जीतील लोकांना दिले असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले असल्याने नगरपंचायत प्रशासन ‘ओपन स्पेस’ चे रेकॉर्ड तयार करून सदरचे मोकळे भुखंड शासन दरबारी जमा करील अशी आशा लागून होती.मात्र नगरपंचायत अस्तित्वात येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
संबंधितांकडून शासकीय नियम पायदळी तुडवून सुध्दा त्यावर कारवाई होत नसल्याने त्यांना फावते. शहरातील बहुतेक मोकळे भुखंड काही धनदांडग्यांनी आपल्या स्व:मालकीचे समजून हडप केल्याने शहरातील मोकळे भुखंड फक्त कागदावरचं असल्याचे वास्तव आहे.
ले-आऊट निर्माण करतांना मूळ विकासकाने (मालकाने)एकुण जमिनीची 10 टक्के जागा ( मोकळा भुखंड/ओपन स्पेस ) ले – आऊट धारक रहिवाशांच्या सार्वजनिक वापरासाठी सोडणे बंधनकारक आहे.मात्र काही महाभागांनी त्या जागा हडपल्याने तेथील रहिवाशांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी,लहान मुलांना खेळण्यासाठी व वृध्दांना विरंगुळा म्हणून शहरातील ले – आऊट मध्ये जागाचं शिल्लक नसल्याचे समोर आले आहे.सर्वसामान्यांसाठी राखीव असलेल्या हक्काच्या मोकळ्या जागांवर सामाजिक हिताचा बहाना समोर करीत काहींनी आपली दुकानदारी सुरू आहे.तर काहींनी भूमी अभिलेख विभागाला हाताशी धरून ‘ओपन स्पेस’ वर आपला मालकी हक्क दाखविल्याचे समोर आले आहे.त्यामुळे शहरातील विविध भागातील ले – आऊट मध्ये येथिल नागरिकांना सार्वजनिक वापरासाठी हक्काची राखीव मोकळी जागा नसल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे.त्यामुळे आता तरी नगरपंचायत प्रशासन हे ‘ओपन स्पेस’ शोधून ते नागरिकांसाठी खुले करण्याची धमक दाखवेल का? असा रोखठोक सवाल ‘लोकशाही’ने नगरपंचायत प्रशासनास विचारत बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाकडून ‘ओपन स्पेस’ शासन दरबारी जमा करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याने मोकळे भूखंड हडप करणा-यांची धाबे दणाणले आहेत.