बोदवड (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एक ६५ वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दि.२५ रोजी प्रशासनाला प्राप्त झाला होता.सदरची कोरोना पॉझिटिव्ह महिला मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा या गावात १३ दिवस आधी मुक्कामी राहिल्याची माहिती प्रशासनाला कळताच तालुका आरोग्य यंत्रणेने मन्यारखेडा येथे धाव घेत महिलेचा ज्या ठिकाणी मुक्काम होता तेथील त्यांच्या संपर्कातील ११ जणांना पुढिल तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते.
तसेचं हि महिला बोदवड शहरातील एक तर तालुक्यातील गोळेगाव येथील दोन व हिंगणा येथील एका नातेवाईकांकडे १० ते १५ मिनिटे थांबली असल्याचे समोर येताचं त्यांच्या संपर्कातील चौघांना पुढिल तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तपासणी केल्यानंतर चौघांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते.चौघांच्या १४ दिवस होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्या नंतर चौघांनाही कोरोनाची लक्षणे आढळून आली नसल्याने चौघांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांनी ‘लोकशाही’ शी बोलताना दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या चौघांच्या तपासणी अहवालाकडे बोदवड तालुका वासियांचे लक्ष लागून होते व यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.मात्र संबधित चौघे कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाल्याने बोदवडकरांना दिलासा मिळाला आहे.