पाचोरा (प्रतिनिधी) : येथील गिरणाई शिक्षण संस्था संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय पाच शिक्षक व दोन शिपायांची बोगस भरती तसेच अमळनेरच्या जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाने बनावट वैयक्तिक मान्यता आदेश तयार करून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीने अहवाल थेट शिक्षण संचालकांना सादर करून शालार्थ आय.डी.मंजूर करून घेतल्याप्रकरणी संबंधीत शिक्षक व शिपायांच्या संस्थेच्या अध्यक्षां विरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आ.किशोर पाटील यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. गिरणाई शिक्षण संस्था संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा या संस्थेच्या संस्थाचालकांनी शासन निर्णयानुसार 8 रिक्त पदांवर बनावट संच मान्यतेच्याआधारे मयुर किशोर महाजन, मिलिंद माधव सावळे, संगीता मनोहर सोनवणे, संदीप दिनकर पाटील, वैशाली पुरनदास राठोड, शिपाईपदी नितीन मिठाराम सोनवणे, निखिल विकास नाईक यांची संस्थेचे अध्यक्ष सचिव पंडित परशराम शिंदे (पाचोरा) व मुख्याध्यापकांनी पाच शिक्षकांचे बनावट आदेश तयार करून त्यावर शिक्षण अधिकार्यांची बनावट सही करून अहवाल सादर केला आहे. चौकशीअंती सन 2014 या वर्षाचा जावक क्रमांक त्यावर नमूद असून हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मार्फत जिल्हा परिषदेला सादर न करता परस्पर शिक्षण उपसंचालक (नाशिक) यांच्याकडून शालार्थ आय.डी.प्रकरण मंजूर करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील धनदाई माता एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र. डांगरी, ता. जि. धुळे) येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पदे रिक्त नसतांना देखील रोहिदास प्रताप ठाकरे, प्रदिप लिलाधर धनगर, भाग्यश्री रामदास वानखेडे, दत्तू भगवान कोळी यांची शिक्षण सेवक पदासाठी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय दयाराम पाटील व वसंत तानकु पाटील आणि संचालक मंडळाने शिक्षणाधिकार्यांची बनावट स्वाक्षरी वैयक्तिक मान्यता आदेश तयार केले. 21 जुलै 2014 ते 6 फेब्रुवारी 2020 दरम्यान पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा आणि धनदाई माता एज्युकेशन सोसायटी (मोहाडी, धुळे) संचलित जय योगेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय (अमळनेर) या संस्थेचे अध्यक्ष, सचिव दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत बारकु पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी संस्थेच्या शाळेतील उपशिक्षक यांचे शिक्षण सेवकांचे व शिपाईपद अशी रिक्त पदे नसतानांही शासनाकडे जिल्हा परिषदेमार्फत आदेश न पाठवता शिक्षणाधिकार्यांच्या बनावट स्वाक्षरीने प्रकरण सादर करून बनावट आदेश तयार करून शासनाची उपसंचालकांची व शिक्षण यांची फसवणूक केल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.