लुधियाना : पंजाबच्या लुधियानामध्ये बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून देण्यासाठी एक तरुणी चक्क १०० फूट उंचीच्या उच्चदाबाच्या वीजेच्या टॉवरवर चढली. या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. जवळपास चार तास हे नाट्य रंगलं. तरुणीच्या कुटुंबीय या लग्नाला तयार झाल्यानंतर तिला खाली उतरवण्यात आलं.
लुधियानातील मच्छीवाडा गावात हा प्रकार घडला. १९ वर्षीय तरुणीचे कुटुंब मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. ते बेट परिसरात राहतात. तरुणीचे उत्तर प्रदेशातील २६ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. या तरुणीने ही बाब घरच्यांना सांगितली. मात्र, त्यांनी या लग्नाला विरोध केला. तरुणाचे वय तिच्यापेक्षा अधिक आहे. तो ओळखीतलाही नाही असे सांगून त्यांनी लग्नास विरोध दर्शवला. त्यानंतर या तरुणीला राग आला. घरच्यांनी अखेर लग्नाला होकार दिला, पण त्या तरुणासमोर काही अटी ठेवल्या. लग्नाआधी त्यांच्या मुलीच्या नावावर ५० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. दोन्ही कुटुंबांमध्ये पैशांबाबत चर्चा सुरू होती. त्याचवेळी तरुणी घरातून निघून गेली. गावाजवळच्या एका उच्चदाबाच्या वीजेच्या टॉवरवर ती चढली. हे दृश्य पाहून आजूबाजूचे शेकडो नागरिक त्या ठिकाणी जमले. घरच्यांनी तिची समजूत काढण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तिनं मान्य केलं नाही. टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी तिनं दिली.
या घटनेची माहिती शेरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ती खाली उतरली नाही. अखेर तिच्या बॉयफ्रेंडला बोलावण्यात आलं. जवळपास चार तास हे नाट्य रंगलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाला होकार दिला. तरुणीला खाली उतरवण्यात आलं.