लोकशाही न्यूज नेटवर्क
नांदेड : बेरोजगारी तरुणाई बेजार. काेराेनासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या विविध विभागांतील नाेकरभरती जवळजवळ बंद आहे. त्यातच काेराेनाकाळात कित्येकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत.
त्यामुळे बेराेजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायाने आता मिळेल ते काम करण्याची सुशिक्षित बेराेजगारांची तयारी आहे. त्यातूनच राज्य राखीव पाेलीस दलाच्या भाेजनसेवक व सफाईगार या वर्ग-४ च्या पदासाठी चक्क उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत.
राज्यात एसआरपीएफच्या १४ गटांसाठी ही नाेकरभरती घेतली जात आहे. चतुर्थ श्रेणी वर्ग-४, गट-ड यातील भाेजनसेवक व सफाईगार या पदासाठी ही सरळसेवा भरती घेतली जात आहे. पुणे, दाैंड, जालना, मुंबई, अमरावती, साेलापूर, नवी मुंबई, हिंगाेली, औरंगाबाद, गाेंदिया, काेल्हापूर येथील जागांसाठी ही भरती हाेत आहे. त्यात भाेजनसेवकाच्या ९४ तर सफाईगाराच्या ४१ जागा काढण्यात आल्या आहेत. त्यातील ३० टक्के जागा महिलांसाठी आहेत.
२० जानेवारी ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. त्यासाठी ७ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता मागण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात या चतुर्थ श्रेणींच्या पदासाठी पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेराेजगारांनी अर्ज केले आहेत. हे अर्ज पाहून एसआरपीएफ कमांडंटचे डाेळे विस्फारले आहेत. उच्चशिक्षितांनी केलेले हे अर्ज बेराेजगारीची तीव्रता विशद करते.
शासनाने गेल्या काही वर्षांपासून नाेकरभरतीच घेतलेली नाही. पाेलीस शिपाई पदाच्या हजाराे जागांची भरती घेणार याची घाेषणा वारंवार सरकारमधून करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात या भरतीचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. त्यासाठी सातत्याने अलीकडे काेराेना महामारीचे कारण पुढे केले जात आहे. भरतीची घाेषणा झाल्यानंतर इच्छुक तरुण मैदानावर तयारी करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात भरती घेतली जात नसल्याने त्यांची घाेर निराशा हाेते.
या भरतीच्या प्रतीक्षेत कित्येक तरुणांनी वयाेमर्यादा ओलांडली आहे तर काही त्या वाटेवर आहेत. यापूर्वी नाेकरभरतीसाठी हजाराे उमेदवारांनी अर्जही दाखल केले. परंतु काेराेना लाट उद्भवल्याने ही भरती प्रक्रिया पुढे राबविली गेली नाही.
शासनाच्या इतर अनेक विभागांत नाेकरभरतीबाबत हीच स्थिती आहे. एकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शेकडाे जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे आऊटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीने या जागांवर उमेदवार घेतले जात आहेत. विविध विभागात तर सेवानिवृत्तांना प्राधान्य दिले जात असल्याने तरुणांनी राेजगार शाेधावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.