जळगाव | प्रतिनिधी
येथील लेवा ऐज्यूकेशन संस्थेव्दारा संचलित बेंडाळे महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये आज दुपारी जेवणात डोक्याचा केस निघाल्यावरून राडा झाला. दरम्यान, काही तासातच सोशल मीडियात अन्नात आळी निघाल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली. सायंकाळपर्यत जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी कँन्टीनला भेट दिली असता घरगूती वापराचे 21 सिलेंडर आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, वसतीगृहातील मुलींची रस्त्यावरील टवाळखोरांकडून छेड काढली जात असल्याने संतप्त विद्यार्थीनींनी आंदोलन केले.
नऊ वर्षापासून एकच ठेकेदार
बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वसतीगृहातील मुलींसाठी एक कँन्टीन सुरू आहे. या कँन्टीनचा ठेका गेल्या नऊ वर्षापासून एकाच ठेकेदार कायम आहे. परिणामी या ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याने विद्यार्थीनी काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे.
जेवणात निघाला केस
दरम्यान, आज दुपारी 12 वाजता जेवण करीत असतांना एका विद्यार्थीनीच्या ताटात केस निघाला. याचा जाब या विद्यार्थींने विचारला. विद्यार्थींनींमधील असंतोषाला या घटनेने वाट मोकळी करून दिली आणि राडा सुरू झाला. या राड्याची चर्चा बाहेर सुरू झाली.
सोशल मीडियावर अपप्रचार
दरम्यान, या घटनेची चर्चा सुरू असतांनाच जेवणाच्या ताटात आळी निघाल्याचे छायाचित्र बेंडाळे महाविद्यालयातील असल्याचे म्हणून व्हायरल होवू लागले आणि घटनेचे गंभीर्य वाढले.
सिलेंडर साठा जप्त
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी सायंकाळी कँन्टीनला भेट देवून तपासणी केली. या तपासणीत कँन्टीनमध्ये घरगूती वापराच्या 21 सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला.
सिलेंडर संस्थेचे
घरगूती वापराच्या सिलेंडरचा एवढा मोठा साठा पाहून जिल्हा पुरवठा अधिकारी सुध्दा अवाक् झाले. कँन्टीन चालकाने हे सिलेंडर संस्थेचे असल्याचे सांगितले. मात्र, याठिकाणी एक रेग्यूलेटर कंपनीचे तर इतर सर्व रेग्यूलेटर बनावट असल्याचे पुरवठा अधिकारी श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले.
विद्यार्थींनींच्या पैशावर संस्थेचा डल्ला?
महाविद्यालयाच्या कँन्टीनमध्ये एकूण 180 विद्यार्थीनी आहेत. एका विद्यार्थीकडून महिना 1700 रूपये शुल्क आकारली जाते. मात्र, यातील 1300 रूपया प्रमाणे संबंधीत कँन्टीन चालकाला संस्थेकडून दिले जातात. उर्वरीत 400 रूपये संस्था आपल्या कडे ठेवून घेत असल्याची चर्चा आज दुपार पासूनच शहरात सुरू झाली होती. संस्था ज्या 400 रूपयांवर डल्ला मारते त्यामुळेच कँन्टीन चालक गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी असल्यास संस्था महिन्याला 70 हजार रूपये लाटत असल्यामुळेच संबंधीत कँन्टीन चालक विद्यार्थींनींना निकृष्ठ दर्जाचे जेवण देत असल्याचा आरोपही या चर्चेत केला जात होता. या आर्थिक हितासाठीच संस्थेने गेल्या नऊ वर्षापासून एकाच ठेकेदाराला कँन्टीन चालविण्याचा ठेका दिल्याचे बोलले जात होते. दरम्यान, घरगूती वापराचा सिलेंडर साठा संस्थेचा असल्याचा दावा कँन्टीन चालकाने केल्यामुळे या प्रकरणात संस्था सुध्दा अडचणीत येणार आहे.
