नवी दिल्ली :- प्रादेशिक ग्रामीण बॅंकांच्या परीक्षा आता मराठी भाषेतही देता येणार आहेत. निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत यासंदर्भात घोषणा केली असून मराठीसह तेरा भाषांमधून घेतली जाणार आहे. ग्रामीण बँकांच्यापरीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (आयबीपीएस) घेतल्या जातात. सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये या परीक्षा घेतल्या जात होत्या.
बँकांच्या परीक्षा यापुढे मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ‘स्थानिक तरुणांना योग्य संधी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा यासाठी बँकांच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होतील. विभागीय ग्रामीण बँकांमधील अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या परीक्षांमध्ये हा पर्याय उपलब्ध असेल,’ असं सीतारामन म्हणाल्या.

