जम्मू- काश्मीर :- पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 41 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवाना समावेश होता. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत (४५) व लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड (३७) या दोन जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच एकर जमीन देण्याची घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली.
नितीन राठोड हे ५० दिवसांची सुट्टी घालवून ११ फेब्रुवारीला आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. कुटुंबीयांसोबत घालवलेली त्यांची ती सुटी शेवटची ठरली. जिल्ह्यातील दोन जवान गमावल्यामुळे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली.
संजयसिंह राजपूत-दीक्षित आणि लोणार तालुक्यातील गोवर्धननगर येथील वीर जवान नितीन राठोड यांच्या घरी संजय राठोड यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मदतही जाहीर केली. हे दोन्ही प्रस्ताव मंत्रालयात तात्काळ पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, तहसीलदार कव्हळे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.