पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वात जास्त गाजलेल्या बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारातील मास्टर माईंड तसेच प्रमुख आरोपी सुनील झंवर याला काल नाशिक येथे पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली होती. दरम्यान सुनील झंवर याला आज पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवणारा सुनील झंवर याला काल सकाळी नाशिक येथून पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याला लागलीच पुणे येथे नेण्यात आले. आज दुपारी त्याला पुणे येथील न्यायालयात सादर केले असता त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच जितेंद्र कंडारेला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पाठोपाठ आता सुनील झंवरकडून पोलिसांना महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यात नेमके कोणते पैलू उघड होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.